Sharad Pawar Jayant Patil ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडली. या सभेतून विविध नेत्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही वळसे पाटलांना इशारा दिला. "पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. त्यांचे अनेक डाव आम्ही बघितले आहेत. कोणी तेल लावून तयार आहे असं म्हणलं होतं. वस्ताद हा नेहमी एक डाव राखून ठेवतो आणि तो डाव जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळे तेल लावलेले पैलवान चितपट होतात," असं जयंत पाटलांनी म्हटलं होतं. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावरून नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सुजय विखे पाटील म्हणाले की, "जयंत पाटील हे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटचा डाव टाकतील, असं म्हणतात. मात्र जयंत पाटील हेच शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार आहेत, ते आधी विचारुन घ्या. नाही तर शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकायचे," असा टोला विखेंनी लगावला आहे.
मंचरमधील सभेत काय म्हणाले होते जयंत पाटील?
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील मंचर इथं झालेल्या सभेत अजित पवार गटावर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले की, "मधल्या काळात काही लोकं पक्ष सोडून गेले. जाताना सोबत पक्षाचे नाव आणि चिन्ह सुद्धा हिसकावून नेले. सुप्रीम कोर्टाने देखील ताशेरे ओढत पवार साहेबांच्या पक्षाला ७ दिवसाच्या आत चिन्ह द्या, असा आदेश निवडणूक आयोगाला दिला. लई विषय उघडला तर लई टोकाला जाईल. आम्ही बोलत नाही कारण आमची संस्कृती संयमाची आहे. शरद पवार साहेब हाच आपला पक्ष आहे, त्यामुळे बाकी गोष्टींची चिंता करायची आपल्याला गरज नाही. शून्याचे शंभर करण्याची ताकद आदरणीय पवार साहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीकर देखील दचकून असतात. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. त्यांचे अनेक डाव आम्ही बघितले आहेत. कोणी तेल लावून तयार आहे असं म्हणलं होतं. वस्ताद हा नेहमी एक डाव राखून ठेवतो आणि तो डाव जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळे तेल लावलेले पैलवान चितपट होतात," असा इशारा पाटील यांनी विरोधकांना दिला.
दरम्यान, "नैतिकतेचे अधिष्ठान घेऊन काम करणाऱ्यांचे मागे परमेश्वर देखील ताकद उभी करतो. त्यामुळे बूथ कमिटी मजबूत करण्याचे काम करा. घराघरात पोहोचा. समोरून प्रचंड शक्ती तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करेल, पण डगमगू नका. महाराष्ट्र धर्म वाचविण्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकविण्यासाठी एकजुटीने लढूयात," असं आवाहन जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.