टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर): पारनेर तालुक्यातील अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावरील ढोकी शिवारात बुधवारी दुपारी जमिनीमधून प्रचंड आवाज करत लाव्हासदृष्य काळा द्रव पदार्थ बाहेर पडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.ढोकी शिवारातील भाऊसाहेब गोविंद बरकडे यांच्या गट नं. ११७ मध्ये ही घटना घडली. दुपारी अचानक मोठा आवाज आल्याने परिसरातील लोक भयभीत झाले. या वस्तीनजिक राहाणारे छबुलाल खान यांना दिसलेले दृष्य तर अचंबित करणारे होते. बरकडे यांच्या जमिनीतून धूराच्या लोटासह ज्वाला जमिनीतून निघत होत्या. लाव्हारसासारखा काळा द्रव बाहेर इतरत्र पडला होता. हे प्रकार पाहताच त्यांनी सरपंच बाबासाहेब नऱ्हे यांना मोबाईलवरून माहिती दिली. काही वेळातच परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जिथे ही घटना घडली तिथून इलेक्ट्रीक स्टेट लाईट जात असल्याने जमिनीखाली करंट उतरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, गावकऱ्यांच्या मते, या परिसरात जमिनीखालून नेहमीच आवाज येत असतात. काही वर्षांपूर्वी डोंगरात स्फोट होवून १२ फुटाचा खड्डा पडल्याची घटना गारखंडी येथे घडली होती.तर मागील महिन्यात धोत्रे येथे जमिनीला भेग पडून एका विहिरीचे पाणी गायब होवून ते दोन किलोमीटर अंतरावरील कूपनलिकेवाटे पाणी वाहत होते. त्यामुळे या परिसराची भूगर्भ तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
अहमदनगरमध्ये निघाला लाव्हासारखा पदार्थ!
By admin | Published: June 02, 2016 2:43 AM