मुंबई : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आता 'अहिल्यानगर' या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माहिती दिली आहे.
अहमदनगरच्या नामांतराची मागणीही अनेक वर्षांपासून होत होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी नेत्यांनी यासंदर्भात वक्तव्येही केली होती. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने नामांतराची मागणी मान्य करून व विधानसभेत तसा ठराव पारित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. तो आता मंजूर झाला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ते ट्विटद्वारे म्हणाले, "अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनापासून आभार."