मुंबई- अहमदनगरमधील एका तरूणाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
अविनाश शेटे या तरूणाने सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र, सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात फेऱ्या मारावा लागत होत्या. मंत्रालयाच्या रोजच्या चकरा मारून दमलेल्या या तरूणाने आज मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगवार रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी अविनाशला वेळीच ताब्यात घेतल्याने त्याला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान, पोलिसांकडून अविनाशची चौकशी केली जाते आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्यातील धर्मा पाटील या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संपादित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मंत्रालयाच्या खेटा मारून वैतागलेल्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येच्या प्रयत्नातून सुरूवातील बचावलेल्या धर्मा पाटील यांच्यावर आठ दिवस मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार झाले पण आठ दिवसांनंतर धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला.