- रवींद्र देशमुख
मुंबई - राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता भविष्याचा वेध घेण्यात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेते आघाडीवर दिसत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगरमध्ये सर्वाधिक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यामुळे अहमदनगरला पक्षांतराचा जिल्हा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पक्षांतराचा सर्वाधिक धक्का राष्ट्रवादीला बसला आहे. २०१४ पासून चार नेत्यांनी पक्षांतर केले असून दोन नेते भाजपच्या वाटेवर आहेत.
२०१४ पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. यापैकी सर्वच्या सर्व नेते भाजपमध्येच गेले आहेत. यावरून नगरच्या नेत्यांची पक्षांतरासाठी केवळ भाजपलाच पसंती असल्याचे दिसून येते. अर्थात भाजप राज्यातील मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील ८ नेत्यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यापैकी अनेक जण निवडूनही आले आहेत.
भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीतील चार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वैभव पिचड आणि संग्राम जगताप यांचा प्रवेश बाकी आहे. हे दोघे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे. पिचड आणि जगताप यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे आणि स्नेहलता कोल्हे यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी याच वर्षात भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे खासदार झाले, तर राधाकृष्ण विखे यांना राज्यात मंत्रीपद मिळाले. तर बाळासाहेब मुरकुटे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी होते. ते आता नेवासा मतदार संघातून आमदार आहेत. तर आम आदमी पक्षातून भाजपमध्ये गेलेले नितीन उदमाले श्रीरामपूरमधून भाजपकडून इच्छूक आहेत.
एकूणच नगर जिल्ह्याचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांवरच सुरू आहे. या नेत्यांनी काळाची पावलं ओळखून आपल्या पक्षांना रामराम केला. मात्र नगरी नेत्यांच्या या पक्षांतराचा सर्वाधिक धक्का राष्ट्रवादीलाच बसला आहे.