विलास गुंजाळ, ऑनलाइन लोकमत
संगमनेर, दि. २३ - कोठे बुद्रूक हे संगमनेर तालुक्यातील डोंगरदऱ्यातील छोटसं गाव. जगाच्या नकाशावर हे खेडेगाव कदाचित सापडणारही नाही. परंतु या गावची शेतकरी कन्या नीता अशोक भालके हिने मात्र आपल्या कार्यकर्तृत्वाने या गावाचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. संशोधन क्षेत्रात आपले जीवन वाहिलेल्या एरोस्पेस इंजिनिअर असलेल्या नीता हिने आपल्या कल्पकतेने व नवनिर्मितीने नासाच्या शास्त्रज्ञांनाही भुरळ पाडली आहे.मंगळयान या भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमेत नासाच्या टीमबरोबर योगदान देणारी नीता आता पुढील शि़क्षणासाठी थेट मँचेस्टरला रवाना झाली आहे.संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रूक या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नीता हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण संगमनेरच्या बाल शिक्षण मंडळाच्या शाळेत झाले. बारावीनंतर तिने गेट परीक्षा दिली. या परीक्षेत यश मिळवल्याने तिची पवई येथे आय.आय.टी.साठी निवड झाली. या ठिकाणी तिने सादर केलेल्या फ्लार्इंग आॅब्जेक्टमुळे संबंधित संस्थेचा मोठा गौरव झाला. तिच्या बुद्धिमत्तेमुळे तिला मंगळयानाच्या मोहिमेत काम करण्याची संधी मिळाली होती. या टीममध्ये २७८ शास्त्रज्ञांचा समावेश होता. यामध्ये नीताने आपल्या बुद्धीची चमक दाखवून दिली.संशोधनाची आवड असल्याने तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पवईमार्गे तिने थेट मँचेस्टर गाठले. तिच्या निवडीमुळे कोठे बुद्रूक गावाचा गौरव झाला असून हे गाव आता तिच्या रुपाने जगाच्या नकाशावर पोहोचले आहे.नीता हिने मंगळयान या भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमेत नासाच्या टीमबरोबर योगदान दिले. आपल्या कल्पक बुद्धिमत्तेने व नवनिर्मितीने तिने नासाच्या शास्त्रज्ञांचेही आपल्याकडे लक्ष वेधले होते. या यशानंतर तिची पुढील शिक्षणासाढी मँचेस्टर येथे निवड झाली आहे. ती नुकतीच संशोधन वारीसाठी मँचेस्टरकडे रवानाही झाली. जगातील १० प्रमुख विद्यापीठांपैकी मँचेस्टर हे अग्रस्थानावरील विद्यापीठ आहे.
सुनीता, कल्पना आपल्या आयडॉलविविध अंतराळ मोहिमेत भारताकडून ठसा उमटवणाऱ्या सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांना आपण गुरुस्थानी मानतो, असे ती सांगते. खेळ आणि वाचनाचीही आपल्याला आवड असल्याचेही ती आवर्जून सांगते.