खामगाव (बुलडाणा): पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी पालन, कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शासनाच्यावतीने निकषपात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येते. यासाठी २0१५-१६ या वर्षात विभागातील ८६७ लाभार्थ्यांची निवड केली जाणार असून, त्याकरीता ११ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु योजनेचा लक्ष्यांक कमी आणि लाभार्थी संख्या भरमसाठ असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळ संकरीत गायी, म्हशीचे वाटप, अंशत: ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी शेळी, मेंढी गट वाटप, तसेच मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्व योजनेंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभ दिला जातो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांची यामध्ये निवड केली जाते. योजनेचा लाभ घेवू इच्छिणार्या अर्जदारांनी तालुकास्तरावर अर्ज सादर करणे अनिर्वाय आहे. जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या अर्जातून योग्य लाभार्थ्यांची निवड केली जाते. अनुदान तत्वावर लाभ दिला जात असला तरी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वत:चा हिस्सा भरणा करावा लागतो. २0१५-१६ या वर्षाकरिता विभागातील अमरावती जिल्ह्यात २४२ लाभार्थी, बुलडाणा १८९, यवतमाळ २३३, अकोला १४४ तर वाशिम जिल्हयातून ९८ लाभार्थ्यांचे लक्ष्यांक आहे. लक्ष्यांक कमी असला, तरी वेगवेगळय़ा योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेकडो लाभार्थींनी अर्ज केले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने, शेवटच्या दिवशी तालुका पशुधन विभागात अर्ज सादर करणार्यांची झुंबड उडाली होती. यावर्षी कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने लाभार्थी हैराण झाले. योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना मार्च २0१६ अखेर लाभ मिळणार आहे.
*पशुधन विभागाकडे शेकडो फाईली
दुधाळ जनावरे, मांसल कुक्कुट पक्षी, शेळी, मेंढी गट वाटप आदी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेकडो अर्जदारांनी पशुधन विभागाकडे फाईली जमा केल्या आहेत. लाभधारकांची संख्या मात्र मोजक्याच लोकांची राहणार असली तरी, लाभ मिळेल या आशेने सर्वच जण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करतात. दरवर्षीच लक्ष्यांक कमी असल्याने लाभार्थ्यांंचा हिरमोड होतो.