मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर मुस्लीम आणि दलित मतांना सोबत घेऊन राज्याच्या राजकारणात नवीन आघाडी उदयाला आणतीला असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, त्यांच्या या इराद्याला विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरंग लागल्याचे चित्र आहे. लोकसभेला सोबत लढलेला एमआयएमने वंचितपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या या निर्णयाचे आरपीआय नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केले आहे.
लोकसभा निवडणुकीत एमआयएमला वंचितसोबत जाऊन काहीही फायदा झाला नाही. उलट वंचितला सर्वाधिक फायदा झाला. यापुढेही वंचित आघाडीतून आणखी काही लोक बाहेर पडतील. ते बाहेर पडलेले लोक आमच्या पक्षात सामील होतील असा दावा करताना आठवले यांनी वंचितमधून बाहेर पडलेल्या एमआयएमचे स्वागतच केले.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या वेळी राज्यातील विधानसभेत पुढील विरोधीपक्ष नेते वंचितचा असेल असा दावा केला होता. त्यामुळे वंचितच्या नेत्यांचे मनोबल वाढले होते. परंतु, आठवले यांच्या मते विरोधीपक्ष नेते होण्याइतकी मते वंचितला मिळणार नाही. लोकसभेला त्यांना मते मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसा लाभ होणार नाही, असंही आठवले यांनी सांगितले.
दरम्यान १०० जागांची मागणी असताना प्रकाश आंबेडकरांनी केवळ ८ जागांची ऑफर दिल्यामुळे एमआयएमने वंचितमधून काढता पाय घेतल्याचे बोलले जात आहे. वंचितमधून बाहेर पडत असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सहाजिकच वंचितची ताकत कमी होणार आहे. दुसीरकडे एमआयएम अधिकृतरित्या बाहेर पडली नसल्याची सारवासारव वंचितकडून करण्यात येत आहे.