मुंबई - विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची पुन्हा आघाडी होण्याची शक्यता वतर्वली जात आहे. तर जागांची तडजोड केल्यास आघाडी होऊ शकते, असं संकेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहे. मात्र असे असतानाही एमआयएमने एकामागे एक उमेदवार जाहीर करण्याचा धडाकाचं लावला आहे. दुसरीकडे वंचीत बहुजन आघाडीने मात्र यादी जाहीर करण्याचा निर्णय वेटिंगवर ठेवला असल्याचे पाहायला मिळत आहे.
सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचे कारण देत एमआयएमने वंचित बहुजन आघडीसोबत जाणार नसल्याचे आधी जाहीर केले होते. त्यांनतर सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितसोबत आघाडी होईल, असं म्हणत जलील यांनी मनोमिलनाचे संकेत दिले. तर एमआयएमसाठी अजूनही आमचे दार खुले असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
एमआयएमने ११ सप्टेंबरला तीन उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता पुन्हा रविवारी खासदार जलील यांनी चार उमेदवार जाहीर केले आहेत. एकीकडे सन्मानजनक जागा मिळाल्यास 'वंचित'सोबत जाण्याचा दावा एमआयएम करत आहे. तर दुसरीकडे उमेदवार जाहीर करण्याचा धडका सुद्धा जलील यांनी लावला आहे. अशा परिस्थित मात्र प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय अजूनही वेटिंगवर ठेवला असल्याचे दिसत आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत, आम्ही २८८ मतदारसंघाची तयारी केली असल्याचा दावा केला आहे. तर एमआयएमकडून ही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, आतापर्यंत ७ उमेदवार जाहीर सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे जरी दोन्ही पक्षातील नेते एकत्र येण्याचे संकेत देत असले तरीही, प्रत्यक्षात तसे होईल याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच एमआयएमने रविवारी सोलापूर मध्य व दक्षिणचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर या मतदारसंघावर वंचितचा दावा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे अंतिम निर्णय काय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.