औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा साधेपणानं ईद साजरा करण्यात यावी, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समुदायाला यासंदर्भात आवाहन केलं आहे. बकरी ईदसाठी शासनाकडून नियमावलीदेखील जारी करण्यात आली आहे. मात्र ही नियमावली अमान्य असल्याचं म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप नोंदवला आहे.यंदा ईदसाठी ऑनलाईन खरेदी विक्री करण्यात यावी, असे आदेश शासनानं दिले आहेत. त्यावर जलील यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 'ज्यांना शक्य असेल, ती मंडळी ऑनलाईन खरेदी, विक्री करू शकतील. पण एक, दोन जनावरं असलेल्या व्यक्तींनी काय करायचं? नेते, अधिकारी यांच्याकडे स्मार्टफोन असतात. गरिबांकडे ती सोय नसते. त्यांचा विचार कोण करणार? जनावरं विकून दोन पैसे मिळवणाऱ्यांचा विचार कोणी करायचा?,' अशी प्रश्नांची सरबत्ती जलील यांनी केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेले नियम केवळ आमच्यासाठीच आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला. गर्दी टाळण्यासाठी आम्हाला निर्देश देण्यात येतात. हेच नियम पंतप्रधान मोदींना लागू होत नाहीत का? त्यांनादेखील ५ ऑगस्टचा राम मंदिराचा कार्यक्रम प्रतिकात्मक करायला सांगा. त्यांना दिल्लीतून प्रतिकात्मक भूमिपूजन करू द्या', अशा शब्दांत जलील यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला.१ ऑगस्ट रोजी ईद-उल-अजहा साजरी केली जाणार आहे. त्यासोबत श्रावण, गणेशोत्सव, मोहरम येणार आहे. त्यामुळे आता नियम, अटींसह सर्व धार्मिळ स्थळे उघडावीत. तसंच ईद-उल-अजहाची नमाज ईदगाहवर अदा करू द्यावी, अशी मागणी मौलवींची आहे. प्रतिकात्मक कुर्बानी शक्य नाही, ती कशी असते, हेही शासनानं स्पष्ट करायला हवं, असं मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं.
"नियम फक्त ईदसाठी आहेत का?; मग मोदींनाही राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करायला सांगा"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 8:07 PM