अकोला, दि. १३- प्रहारचे अमरावती येथील आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन पदवीधर मतदार संघातील प्रहारचे उमेदवार प्रा.दीपक धोटे यांना पाठिंबा देण्याची विनवणी केली. दरम्यान, यासंदर्भात लवकरच दुसरी सकारात्मक बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार कडू यांनी दिली. शुक्रवारी ते प्रहारचे अमरावती मतदार संघाचे उमेदवार प्रा.धोटे यांच्या प्रचारार्थ आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . अँड. प्रकाश आंबेडकर अकोला आणि विदर्भात सातत्याने गोरगरिबांसाठी लढत आहेत, प्रहारदेखील शेतकरी आणि दीनदलितांच्या हक्कासाठी लढत आहे. त्यामुळे मित्र पक्षाची युती सोबत असावी म्हणून आम्ही अँड.आंबेडकरांना भेटलोत. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, दुसरी सकारात्मक बैठक लवकरच होणार आहे, अशी माहितीही आ.कडू यांनी दिली. सुधीर कॉलनीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी उमेदवार प्रा.धोटे आणि प्रहारचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील अनुशेषावर टीका करून सत्ता मिळविणार्यांना मतं मागण्याचादेखील नैतिक अधिकार नाही. किती बेरोजगारांना नोकरी दिली, किती उद्योग विदर्भात आणले, याचा जाब द्यावा लागेल, असेही ते बोललेत. बेरोजगारांना रोजगार आणि शेतकर्यांच्या शेतमालास भाव देण्याचे कर्तव्यही सत्ताधार्यांनी बजावले नाही. पदवीधरांसाठी असलेल्या निवडणुकीत बेरोजगारांचे प्रश्न उपस्थित होत नसतील तर आंदोलन म्हणून आम्ही लढू. किती मते मिळणार, असा प्रश्न त्यांना केला असता, आम्ही जिंकण्यासाठीच आहोत, असे उत्तरही त्यांनी दिले. मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. एक आमदार काय करू शकतो, हे मी दाखविले आहे. त्यामुळे प्रहारचे प्रा.धोटेदेखील खूप काही करू शकतील, जर त्यांना सुशिक्षितांनी साथ द्यावी, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोललेत. औरंगाबादच्या पदवीधर मतदार संघात निवडणूक लढविणार्या बिल्डरवरही त्यांनी येथे टीका केली. धार्मिक झेंड्याआड निवडणूक लढविण्यापेक्षा विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली गेली पाहिजे. घटनेत ही तरतूद असताना सर्वोच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागतो, ही शरमेची बाब आहे, असा खेदही त्यांनी येथे व्यक्त केला. पत्रकार परिषदेला प्रहारचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पदवीधर मतदारसंघासाठी प्रहारला हवा भारिपचा पाठींबा
By admin | Published: January 14, 2017 12:46 AM