पालकांनी पुढाकार घेण्याची गरज : शिक्षण संस्थातील प्राध्यापकांचीही जबाबदारीअनुराग खापर्डे आणि इशिता मालय यांच्या अपघाती मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. देशाचे भवितव्य असलेली तरुण मुले अपघाताने हरवत असतील तर हा प्रश्न केवळ काही कुटुंबांचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा आहे. या युवकांना आम्ही कुठला संस्कार आणि कुठले वातावरण देतो आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे. वाईट बाबींना प्रतिष्ठा देणारा समाज आम्ही निर्माण करीत असू तर युवकांना गैर वळण लागणारच. तरुणाई बेधुंद असते पण तरुणाईच्या बेधुंदतेवर अंकुश लावण्याचे आणि त्यांना नियंत्रित करण्याचे काम सर्वात आधी पालकच करू शकतात. यासाठी पालकांनी घरापासून प्रारंभ करण्याची गरज असल्याचे मत समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या व्यक्तिस्वातंत्र्याचे जग आहे. प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जागतिक स्तरावर मान्य करण्यात येत आहे त्यात गैर नाही पण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार आणि मनमानी बोकाळत असेल आणि त्यामुळे आमची तरुण मुले कायमची हिरावणार असतील तर धोक्याची घंटा वाजतेय, हे लक्षात आले पाहिजे. पालकांनी संवाद साधावाप्रत्येक माणूस आज कैवळ पैशाच्या आणि भौतिक सुखांच्या मागे लागला आहे. यामुळे घरातील संवाद संपला आहे. मुलांवर असलेला फाजील विश्वासही तरुणाईला मोकाट सोडणारा आहे. आपला मुलगा किंवा मुलगी याचे मित्रमैत्रिणी कोण, त्यांची पार्श्वभूमी काय? याची माहिती पालकांना नसते. आपले पाल्य कुठे जातात आणि काय करतात याचीही माहिती पालकांना नसते. भाबडेपणाने विश्वास ठेवून पालक मुलांना मोकळे सोडतात आणि त्याचाच गैरफायदा घेतला जातो. मुलांना मोकळे सोडायला हरकत नाही पण पालकांचे किमान त्यांच्यावर लक्ष असले पाहिजे. घरातला संवाद संपत चालल्याने काय चांगले आणि काय वाईट याचा फरक तरुणाईला कळेनासा झाला आहे. पालक आपल्या नोकरी, व्यवसायात गुंतले असल्याने मुलांच्या गरजा पूर्ण करण्यातच पालकांना समाधान वाटते. त्यात हाती पैसा आणि मोकळेपणा मिळाल्याने युवक व्यसनाधीन होत आहेत आणि यात युवतींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेदरकारपणे वाहन चालविणे, कुणालाही न जुमानणे, कायद्याची भीती नसणे अशा बाबी त्यामुळेच घडत आहेत. मुलांच्या गरजा पूर्ण करताना त्यांना केवळ पैसे देऊन काम भागणारे नाही. मुलांशी संवाद साधला गेला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींशी घरच्यांचेही सौहार्द्राचे संबंध असले पाहिजे. यात कुणी मित्र वा मैत्रिण खटकणारी असेल तर मुलांशी त्यांच्याशी असणारी मैत्री नियंत्रित करण्याचा प्रयत्न पालक करू शकतात. (प्रतिनिधी)
तरुणाईच्या अतिउत्साहावर हवा अंकुश
By admin | Published: August 10, 2014 1:31 AM