मुंबई : गुवाहाटीत गेलेले असताना त्या हॉटेलमध्ये कोणत्या आमदारांनी लिफ्टमध्ये एअर हॉस्टेसचा विनयभंग केला, याचा शोध घ्यावा, असा गौप्यस्फोट वकील असीम सरोदे यांनी केला. यावरून आता शिवसेनेच्या दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सरोदे यांच्या आरोपात तथ्य असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. तर, राजकीय सूडभावनेतून हे आरोप असून, यात तथ्य नसल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले.
धाराशिवमध्ये पार पडलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात ॲड. सरोदे म्हणाले की, शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या एका एअर होस्टेसचा विनयभंग केला. हे कोणी केले, याचा महाराष्ट्राने शोध घ्यायला हवा. दारूच्या नशेत झिंगणाऱ्या आमदारांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी सरोदे यांच्या आरोपांचे समर्थन केले. तसेच या प्रकरणात तथ्य असून, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सरोदे यांचे आरोप फेटाळून लावत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. सरोदे हे ठाकरे गटाचे पोपट म्हणून काम करतात. आमच्यावर आरोप केल्याशिवाय यांना काही सुचत नाही. दीड वर्षानंतर यांनी आता आरोप केले आहेत. मात्र, त्यांच्या आरोपांना कवडीची किंमत देत नाही, असे प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिले.