लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मी १९८६ ते २०१४ अशी २८ वर्ष एअर इंडिया मध्ये काम केले स्त्री काही प्रदर्शनात मांडण्यात येणारी वस्तू नव्हे या मुद्द्यावर आम्ही न्यायालयीन लढा दिला आणि त्यामुळेच हवाई सुंदरींच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षाचे करण्यात आले. तिथपासून ते एअर इंडियाने अनेक फायद्याचे प्रवास मार्ग कसे सोडून दिले इथपर्यंतचा प्रवास ऋता आव्हाड यांनी अतिशय मनमोकळेपणाने मांडला.
घरात सामाजिक चळवळीचे वातावरण असताना हवाई सुंदरी होण्याचा निर्णय का घेतला? - हवाई सुंदरी बनण्याचा कोणताही इरादा नव्हता. पदवीचे शिक्षण घेत असताना वृत्तपत्रातील एअर इंडियाची जाहिरात वाचून अर्ज केला. तिथे निवड झाल्यानंतर १९८६ पासून ते २०१४ या काळात काम केले; मात्र घरात सामाजिक चळवळ बालपणापासूनच पाहिली होती.
काकांच्या (दत्ता सामंत) घरात कायम कामगार आपली गाऱ्हाणे घेऊन येत असत. त्यांच्या घरी घाटकोपरला आम्ही जायचो तेव्हा ते कामगारांचे प्रश्न सांगायचे. एअर इंडियामध्ये नोकरीला लागल्यानंतर एअर इंडिया केबिन क्रू असोसिएशनमध्ये सहकोषाध्यक्ष या पदावर काही वर्षे काम केले. त्याकाळी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळी वयाची ३५ वर्षे पार करणाऱ्या हवाई सुंदरीला सेवानिवृत्ती घ्यावी लागत असे. तर पुरुष कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ एवढे होते. यावरून त्या काळात बराच वाद झाला होता. स्त्री काही प्रदर्शनात मांडण्यात येणारी वस्तू नव्हे, या मुद्द्यावर न्यायालयीन लढा दिल्यानंतर अखेर महिला हवाई सुंदरीच्या निवृत्तीचे वय अटी-शर्तींसह ५८ वर्षांचे करण्यात आले.
तरीही महिलांकडून आदेश घेण्यास पुरुष कर्मचारी तयार नसत. स्त्री-पुरुषांमधील भेदभाव तिथेही चुकला नाही. एअर इंडिया तोट्यात जाण्याचे काही कारण नव्हते; मात्र अनेक फायद्याचे प्रवास मार्ग सोडून देण्यात आले. एअर इंडिया आता टाटा कंपनीकडे असल्याने चांगले बदल घडून येणे अपेक्षित आहे.
हवाई सुंदरी ते गृहिणी आणि आता समाजसेविका या प्रवासाचे अनुभव काय सांगाल? - महिला ही २४ तास गृहिणीच असते. आता ती नोकरी करते, ही तिची एक नवीन भूमिका झाली. एअर इंडियामध्ये कामाला असताना २४ तास ते ११ दिवस एवढ्यावेळ मी प्रवासात असायचे. घरी असल्यावर बऱ्याचवेळा संघटनेचे काम करायचे. कामाठीपुरा येथील महिलांचे प्रश्न पाहिले आणि त्यांच्यासाठी काम करायची इच्छा झाली. समाजाला तिथे जाण्यास लाज वाटत नाही तर आपल्याला बोलण्यास लाज का वाटावी? ग्रामीण भागात बचत गट मोठ्या प्रमाणात चालतात. पण शहरी भागात अशा बचत गटांना व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे बचत गटांचा आवाका वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मदर तेरेसा यांच्या सोबतची छोटीशी भेट कायम स्मरणात राहिलीहवाई सुंदरी म्हणून काम करीत असताना अनेक मोठ्या व्यक्ती, राजकीय व्यक्तिमत्त्व, उद्योगपती यांना पाहता आले; मात्र मदर तेरेसा यांची भेट कायम स्मरणात राहील. त्यांचा साधेपणा कायम मनाला भावला. विमान प्रवासात त्या जास्त बोलत नसत; पण त्या सतत जपमाळ करीत असत. अत्यंत साधी राहणीमान असलेली ही व्यक्ती समाजात एवढा मोठा बदल घडवून आणेल, ही बाबच थक्क करणारी आहे.
मनमोहन सिंग भावले कायम स्मरणात राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. मनमोहन सिंग. देशाच्या सर्वोच्च पदावर असतानाही शांत स्वभावाचे, कमी बोलणारे, पण सतत कामात व्यस्त असलेले डॉ. सिंग हे एक आदरणीय व्यक्तिमत्त्वच. प्रवासात अनेक प्रकारच्या प्रवाशांची भेट होत असे;पण ही दोन व्यक्तिमत्त्वं कायम स्मरणात राहतील.