पुणे : इंधन पुरवठ्याची रक्कम थकल्याने पुण्यासह देशातील सहा विमानतळांवर थांबविलेला एअर इंडियाचा इंधन पुरवठा शनिवार (दि. ८)पासून पुन्हा पुर्ववत सुरू केला आहे. त्यामुळे एअर इंडियासमोरील इंधन संकट सध्यातरी टळले आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दि. १६ जुलैला पुण्यासह पाटणा, पुणे, चंदीगड, विशाखापट्टणम व कोची विमानतळावरील एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबविला होता. त्यानंतर काही दिवसांत हा पुरवठा सुरळीत केला. पण त्यानंतरही इंधनाची थकबाकी वाढत केल्याने इंधन कंपन्यांनी पुन्हा एकदा २२ ऑगस्टपासून पुण्यासह मोहाली, रांची, विशाखापट्टण, पाटणा, रायपुर व कोची या विमानतळांवरील इंधनपुरवठा बंद केला होता. त्यामुळे एअर इंडियासमोर इंधन संकट निर्माण झाले होते. या विमानतळांवर इंधन मिळत नसल्याने अन्य विमानतळांवरून विमानात इंधन भरण्याची व्यवस्था केली होती. पण त्यामुळे वेळापत्रकावर परिणाम होऊ लागला होता.
पुण्यातून दररोज एअर इंडियाच्या दहा विमानांच्या विविध ठिकाणी उड्डाण होते. त्यामध्ये दिल्ली, गोवा, हैद्राबाद, चंदीगड, भोपाळ, बेळगावी आदी शहरांचा समावेश आहे. इंधन पुरवठा आणखी काही दिवस बंद राहिल्यास विमान उड्डाणे रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली असती. पण पण शनिवारी (दि. ७) थकित रकमेबाबत तोडगा निघाल्याने संकट टळले आहे. ‘इंधन पुरवठा बंद झाल्याच्या काळात त्यामुळे एकही उड्डाण रद्द केले नाही. शनिवार (दि. ८) पासून इंधनपुरवठा पुर्ववत झाला आहे,’ असे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.