नाशिक : विमानसेवेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक करणे सर्वश्रुत आहे. मात्र नाशिकच्या एका उद्योजकाने तब्बल पन्नास हजार शेळ्या-मेंढ्या नाशिक येथील विमानतळावरून थेट दुबईत पाठविल्या आहेत. त्यामुळे हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. सलग दुसºया वर्षी त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.सामान्यत: विमानतळ हे प्रवासी वाहतुकीसाठी असते. कार्गो सेवेत जीवित प्राणी नेण्याचा प्रकार सहसा नसतोच, परंतु नाशिकच्या कार्गो सेवेतून मात्र प्रथमच शेळ्या व मेंढ्या पाठविण्यात आल्या. नाशिकच्या सानप अॅग्रो कंपनीचे जयंत सानप आणि हेमंत सानप या दोघा बंधूंनी हा प्रयोग केला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सानप बंधू तसे सधन कुटुंबातील आहेत. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय फळे आणि भाजीपाल्याची ते निर्यातही करतात. मात्र, दुबईत व्यवसायासाठी गेल्यानंतर तेथे शेळ्या, मेंढ्यांची वाढलेली मागणी आणि नेमके त्याचवेळी पावसामुळे भारतातून समुद्रमार्गे होणारी वाहतूक बंद होत असल्याने गेल्या वर्षी प्रथमच हवाईमार्गे जिवंत शेळ्या व मेंढ्या पाठविण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी सजिद लॉजिस्टीक या कंपनीची मदत घेतली. भारतीय विमानपत्तन प्राधीकरण आणि अन्य परवानग्या मिळवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. नाशिकमध्ये ओझर जवळ एच. ए. एल. आणि हॉल्कॉन यांच्या विद्यमाने कार्गो हब तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर होत नसला तरी सानप बंधूंनी त्याचा वापर करण्याचे ठरविले. या कामासाठी दुबईतून मालवाहतूक करणारे विमान भाड्याने घेण्यात आले आणि गेल्यावर्षी प्रथमच विमानातून जिवंत शेळ्या, मेंढ्यांची वाहतूक करून त्यांना दुबईत पोहोचवण्याचे काम सानप बंधूंनी केले. समुद्रमार्गे म्हणजे जहाजातून जनावरे नेताना त्यांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. शिवाय पाच ते सहा दिवसांनी जनावरे पोहोचत असतात. येथे मात्र विमानसेवेमुळे अवघ्या चार तासांत दुबई गाठणे शक्य होत असते. शिवाय एकही शेळी किंवा मेंढी दगावत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुरेशी तयारी करूनही केवळ ५० हजार शेळ्या व मेंढ्यांची वाहतूक करता आल्याचे हेमंत सानप यांनी सांगितले. नाशिकच्या विमानतळावर अपेक्षित उंचीचे हायलोडर नसल्याने विमानही मर्यादित उंचीचेच यंदा आणावे लागले. त्यामुळे ३४ फेºया करूनही केवळ ५० हजार शेळ्या, मेंढ्यांची निर्यात करता आली. हाय लोडर आणि अन्य अडचणी दूूर झाल्यास वर्षभर ही सेवा सुरूच ठेवण्याचा मानस असल्याचे सानप यांचे म्हणणे आहे.