नागपूर : बनावट धनादेशाच्या आधारे हवाईदलाच्या नागपूर युनिटच्या खात्यातून १ कोटी ९६ लाख रुपये काढून घेण्यात आले. दरम्यान, तक्रार मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत ही रक्कम काढून घेणाऱ्या आरोपींची दोन खाती गोठवली. त्यामुळे १ कोटी ३८ लाखांची रोकड बचावली आहे.हवाईदलाला जबरदस्त हादरा देणारी ही घटना ३१ डिसेंबर रोजी उजेडात आली. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वायुसेनानगर शाखेत नेहमीप्रमाणे हवाईदलाच्या युनिटच्या खात्यात रक्कम जमा झाली. लेखा विभागातून ही रोकड काढण्यासाठी धनादेश पाठविण्यात आला.मात्र, ‘इनसफिशियन्ट बॅलेन्स’ असा शेरा मारून बँक अधिकाऱ्यांनी हा धनादेश परत पाठविला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ०३८२४३ क्रमांकाच्या धनादेशाद्वारे १४ लाख ५४ हजार ३०० रुपये आणि ०३८२४४ क्रमांकाच्या धनादेशामार्फत १ कोटी ८१ लाख ४७ हजार ८०० असे एकूण १ कोटी ९६ लाख ०२,१०० रुपये काढून घेण्यात आल्याचे उघड झाले.उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिवसभर विचारमंथन केल्यानंतर हवाईदलाचे सहायक सुरक्षा अधिकारी सुनील गोपालकृष्ण पल्लीथाली (४८) यांनी सायंकाळी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी) चेकचे झाले स्कॅनिंगपोलिसांच्या माहितीनुसार, ज्या बनावट चेकच्या माध्यमातून ही रक्कम वळती करण्यात आली ते चेक हवाईदलाच्या लेखाविभागातच आहे. त्याचे स्कॅनिंग करून बनावट चेक तयार करण्यात आले आणि रक्कम एका सरकारी मान्यताप्राप्त खासगी बँकेच्या शाखेतील दोन खात्यांत जमा करण्यात आली.लाखोंची सोने खरेदीपोलिसांना दोन्ही खात्यांत एकूण १ कोटी, ३८ लाख रुपयांची रक्कम जमा असल्याचे कळले. ही खाती तातडीने गोठविण्याची सूचना पोलिसांनी ‘त्या‘ बँकेच्या अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे ही रक्कम बचावली तर, आरोपींनी ५० लाखांचे सोने विकत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूरपासून दिल्लीपर्यंत खळबळअतिसंवेदनशील हवाईदलाच्या गेटवरही बाहेरचा व्यक्ती उभा राहू शकत नाही, तेथे लेखा विभागातील धनादेशाची माहिती मिळवण्यापासून तो तयार करण्यापर्यंतचे काम कोण करू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात ‘घर का भेदी‘असावा, असा पोलिसांना संशय आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने ‘त्या‘ बँकेत खाते उघडले आहे, त्यातील एकाचे आडनाव झा आहे. मात्र ते नाव बोगस असावे, असा कयास आहे.
हवाईदलाला कोटीचा गंडा!
By admin | Published: January 02, 2015 1:22 AM