ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - दिल्लीहून पुण्यात आलेले एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर उतरत असताना टायर फुटल्याने घसरल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हे विमान धावपट्टी सोडून १० मीटर पुढे गेल्याची माहिती समोर आली आहे. विमानातील सर्व १५२ प्रवासी सुखरूप होते. लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी याला दुजोरा दिला.
लोहगाव विमानतळावर शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एअर इंडियाचे एआय ८४९ हे विमान दिल्लीहून पुण्यात आले. लोहगाव विमानतळावर उतरत असताना विमानाच्या मागील चाकाचा टायर फुटला. त्यामुळे विमानाला ब्रेक न लागल्याने आपत्कालीन ब्रेक लावून थांबविण्यात आले. मात्र, तोपर्यंत हे विमान धावपट्टी सोडून सुमारे १० मीटरपर्यंत पुढे गेले होते. यावेळी विमानात १५२ प्रवासी होते.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व विमानतळावरील कर्मचा-यांनी तातडीने विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर लगेच धावपट्टी इतर विमानांना उड्डाणासाठी बंद करण्यात आली. परिणामी सुमारे २ ते २.३० तास एकही विमानाचे उड्डाण होवू शकले नाही, असे समजते. हे विमान ट्रेलरच्या सहाय्याने ओढून पार्किंगमध्ये आणण्यात आले.
दरम्यान, अचानक आप्तकालीन ब्रेक लावण्यात आल्याने काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागल्याचे समजते. याबाबत विमानतळ अधिका-यांकडून माहिती मिळू शकली नाही. अजय कुमार म्हणाले, ही घटना सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी घडली. या घटनेचे कारण चौकशीनंतर समोर येईल. प्रवासी आणि विमान सुरक्षित आहेत.