ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ४ - मुंबई विमानतळावर विमानाच्या लँडींगदरम्यान मोठा अपघात टळला. गुरुवारी रात्री जेट एअरवेजच्या विमानाचा लँडींग करताना टायर फुटला. रात्री 9.50 वाजता ही घटना घडली. सुदैवाने विमानाचं लॅडींग सुखरुप झाल्याने मोठा अपघात टळला. या घटनेनंतर धावपट्टी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती आणि पर्यायी धावपट्टीवर विमानांचं लँडींग करण्यात येत होतं.
दिल्लीहून निघालेलं 9W 354 हे विमान 9.50 वाजता मुंबई विमानतळ लँडींग करत असताना अचानक त्याचा टायर फुटला. विमानात 127 प्रवासी प्रवास करत होते. विमानाचं लॅडींग होत असताना जोरात आवाज आला, विमानाच्या खालच्या बाजूने ठिणग्यादेखील पडत असल्याच्या दिसत होत्या असं एका प्रवाशाने सांगितलं. जोपर्यंत विमान थांबल नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण घाबरलेल्या अवस्थेत होते, जेव्हा विमान थांबलं तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास टाकल्याचं प्रवाशाने सांगितलं. जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी वैमानिकाने लॅडींग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झालं असल्याचं सांगितलं असल्याची माहिती दिली.