पुणे, दि. 23 - आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी संप केल्याने बुधवारी सकाळी 8.30 चे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित झाले नाही. आकाशवाणीच्या इतिहासात बातमीपत्र प्रसारित न होण्याची पहिलीच वेळ आहे. मराठी राष्ट्रीय बातमीपत्र अनेक वर्ष दिल्ली आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होत होत. मात्र खर्च कपातीचे कारण देत दिल्ली वरुन प्रसारित होणारी बातमीपत्र राज्यांच्या राजधानीत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार दिल्ली आकाशवाणी च्या मराठी वृत विभागातून प्रसारित होणारी सकाळी साडे आठ, दुपारी दीड आणि रात्री साडे आठ वाजताची तीन राष्ट्रीय बातमीपत्र 4 जूनपासून राजधानी मुंबईतून प्रसारित होत आहेत. दरम्यान मुंबई मधील एकूणच यंत्रणा आणि व्यवस्था यामुळे सकाळी प्रसारित होणारे राष्ट्रीय बातमीपत्र करण्यास केंद्राने असमर्थता दर्शविली होती. कंत्राटी वृत्त निवेदकांनी संपाचा इशाराही दिला होता. अखेर कालपासून कंत्राटी वृत्तनिवेदकांनी संप पुकारल्याने त्याचा बातमीपत्राला फटका बसला. दिल्ली आकशवाणी वरुन प्रसारित होणा-या भाषिक बातमीपत्रांचा दर्जा ढासळला आहे आणि खर्च कपातीचे कारण देत ही बातमीपत्र राज्याच्या राजधानीत पाठवण्यात आली असली तरी मात्र हा निर्णय घेताना राजधानीतील केंद्र समर्थ आहेत की नाहीत याची खातरजमा करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. बातमीपत्र मुंबईला हलविण्यात आली असली तरी वृत्त निवेदकाचे पद हे पुणे केंद्राकडे दिले आहे, मग पद दिले तर बातमीपत्र देखील द्यायला काय हरकत आहे. पुणे वृत्त विभागात पुरेसे मनुष्यबळ असून, पुणे केंद्र ही जबाबदारी घेण्यास समर्थ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र मिळावे अशी मागणी पुणे केंद्राने केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ मुळे आकाशवाणीला पुन्हा लोकप्रियता मिळाली आहे, असे असतानाही बातम्यांचा दर्जा सुधारण्यावर भर देणे आवश्यक होते. मात्र केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून खर्च कपातीवरच लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.
आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदक संपावर गेल्याने पहिल्यांदाच प्रसारित झाले नाही राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 11:45 AM