मुंबई : नागपुरातील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी भारतीय वायुदल आणि मिहान प्रकल्पाच्या जमिनींची अदलाबदल करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मिहान प्रकल्पातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाला या प्रकल्पाच्या लगत असणाऱ्या भारतीय वायुदलाच्या जमिनीमुळे अडचण निर्माण होत होती. यामुळे राज्य शासनाने यापूर्वीच भारतीय वायुदलाची जमीन मिहान प्रकल्पास देण्याची विनंती केंद्र शासनाकडे केली होती. ही विनंती मान्य करु न केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय वायुदलाची जागा मिहान प्रकल्पास देण्याचे मान्य केले होते. या निर्णयानुसार मिहान प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी वायुदलाच्या ताब्यातील २७८ हेक्टर जमीन व त्याबदल्यात मिहान प्रकल्पाची ४०० हेक्टर जमीन अदलाबदली करण्याचे तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताब्यातील २.३० हेक्टर जमिनीच्या बदल्यात मिहान प्रकल्पाची २.३० हेक्टर जमीन अदलाबदली करण्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आले. मिहान प्रकल्पाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली भारतीय वायुदलाची नागपूर विमानतळाच्या क्षेत्राबाहेरील एकूण २७८ हेक्टर जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे घेऊन त्याबदल्यात मिहान प्रकल्पाकडे असलेली मौजे शिवणगाव इसासनी आणि कलकुही येथील एकूण ४०० हेक्टर जमीन भारतीय वायुदलास देण्यात येणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला देण्यात येणारी भारतीय वायुदलाची ही जमीन विमानतळाच्या हद्दीत येणारी असली तरी याबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण व भारतीय वायुदलाच्या दरम्यान मालकीबाबत मतभेद होते. (विशेष प्रतिनिधी)
वायुदल, मिहानच्या जमिनींची अदलाबदल
By admin | Published: May 04, 2016 2:55 AM