मुंबई : औरंगाबादच्या औद्योगिक विकासासाठी विमानतळाचे विस्तारीकरण होणे गरजेचे असून, त्यासाठीच्या जमीन संपादनासाठी लागणारा २०० कोटींचा निधी औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिले. या निधीमुळे औरंगाबादच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होऊन औद्योगिक क्षेत्राला फायदा होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) वतीने विकसित करण्यात येत असलेल्या शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, डीएमआयसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, महाव्यवस्थापक गजानन पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगाबाद विमानतळाची धावपट्टी रुंद करण्यासाठी १८० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठीचे २०० कोटी रुपये एमआयडीसीने द्यावेत. हा विस्तार शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरेल. तसेच औरंगाबादच्या पर्यटन विकासातही वाढ होणार आहे.
विमानतळ विस्तारीकरण मार्गी
By admin | Published: January 15, 2016 1:03 AM