नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी जी.व्ही.के. कंपनीची निविदा ग्राह्य धरण्यात आली आहे. परंतु दोन महिने झाले तरी या निविदेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे विमानतळाचे टेक आॅफ लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक असलेल्या पर्यावरणविषयक मंजुरीही प्राप्त झाल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे.येथून डिसेंबर २0१९ मध्ये विमानाचे पहिले टेकआॅफ होईल, असा दावा राज्य सरकारने केला आहे. त्याअनुषंगाने सिडकोने विमानतळपूर्व कामांना गती दिली आहे. या कामांसाठी सुमारे १६00 कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यात उलवा टेकडीची उंची कमी करणे, जमिनीचे सपाटीकरण, उलवे नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणे आदी कामांचा समावेश आहे. परंतु विविध कारणांमुळे या कामांनासुध्दा खीळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर विमानाच्या टेकआॅफची डेडलाइन हुकण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राजू गजपती यांनी २0१९ पर्यंत नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार नाही, असे जाहीर विधान केले होते. विमानतळ प्रकल्पाच्या विविध कामांची सध्याची गती पाहता त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. असे असले तरी विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण निर्धारित कालावधीतच होईल, असा दावा सिडकोच्या संबंधित विभागाकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)
विमानतळाचे टेक आॅफ लांबणीवर
By admin | Published: April 25, 2017 2:06 AM