विशेष प्रतिनिधी ।मुंबई : एअरटेलचा मोबाईल क्रमांक ‘आधार’शी लिंक करताच एअरटेल पेमेंट बँकेचे बचत खाते न मागता गळ्यात मारणे आणि स्वयंपाकाच्या गॅसचे एरवी दुस-या बँकेत जमा होणारे अनुदानही या एअरटेल बँकेच्या खात्यात परस्पर जमा झाल्याने मुंबईतील एक ग्राहक चक्रावून गेला आहे.माझगाव डॉक्समधून निवृत्त झालेले गिरगावचे गोपाळ महादेव जोग १६ जून रोजी एअरटेलच्या गॅलरीत गेले व त्यांनी आपला मोबाइल क्रमांक ‘आधार’शी लिंक केला. हे होताच त्यांना ‘तुमच्या इच्छेनुसार एअरटेल पेमेंट बँकेत तुमचे खाते उघडले आहे’, असे कळविणारा एसएमएस आला. या प्रकाराने जोग चक्रावून गेले,जुलमध्ये जोग यांनी ‘एचपी’चा गॅसचा सिलिंडर नोंदविला. सिलिंडरचे पैसे दिल्यावर त्यांना ‘तुमचे एलपीजीचे ६३ रुपये अनुदान खात्यात जमा झाले आहे’, असा एसएमएस एअरटेल पेमेंट बँकेकडून आला व खात्यातील ती रक्कम दाखविली गेली.‘एचपी’च्या गॅस एजंटकडे गेल्यावर त्याने सांगितले की, केंद्र सरकारच्या मुख्य सर्व्हरमध्ये अशी व्यवस्था आहे की ‘आधार’ क्रमांक ज्या बँक खात्याशी नव्याने लिंक केला जाईल, तेथे अनुदान आपोआप वर्ग होते.जोग यांनी पुन्हा एअरटेल गॅलरीत जाऊन एअरटेल पेमेंट बँकेचे खाते बंद करून, त्यातील अनुदानाचे पैसे परत करा, अशी मागणी केली. खाते बंद केल्यास ५० रुपये दंड भरावा लागेल. त्यापेक्षा खात्यातील पैशातून मोबाइल रिचार्ज करा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावरून बरीच हुज्जत झाली. अखेर एअरटेल गॅलरीतील संबंधित कर्मचाºयाने स्वत:च्या खिशातून ६३ रुपये काढून जोग यांना दिले.
एअरटेल बँकेचे न मागता बचतखाते! मोबाईल ‘आधार’शी जोडण्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:56 AM