श्यामकुमार पुरे, अजिंठा (जि़ औरंगाबाद)अजिंठा लेणीत मागील तीन महिन्यांत मुरूम व दगडांच्या दोन दरडी कोसळल्या होत्या. त्यातच लेणी क्रमांक २६ समोर पुन्हा दरड कोसळल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. सकाळी लेणीत पर्यटक नसतात म्हणून जीवितहानी झाली नाही. लेणीत अशी ९० ठिकाणे धोकादायक असल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाला प्राप्त झाला आहे.लेणीच्या माथ्यावर मोठा डोंगर आहे. दरवर्षी पावसाळ्यात या डोंगराची माती मोकळी होऊन कधी मोठ्या, तर कधी लहान-लहान दरडी कोसळत असतात. १९९८पासून ते २०१४पर्यंत १६ वर्षांत भारतीय रेल्वे रिसर्च संस्था, सेंटर मायनिंग रिसर्च संस्था, दिल्ली, जीएसआय सर्व्हे आॅफ इंडिया, भारतीय भूगर्भतज्ज्ञ, नागपूर या संस्थांनी अनेकवेळा संशोधन केले. त्यात अजिंठा लेणीच्या माथ्यावरील ९० ठिकाणच्या दरड (बोल्डर) धोकादायक बनल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाला दिला आहे. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, मोठ्या पावसामुळे या दरडी कधीही पडू शकतात. म्हणून ते दगड काढून टाकावेत किंवा लेणीच्या डोंगर माथ्यावर स्टीलनेट जाळी लावावी, अशा सूचना (अहवाल) २०१०मध्येच पुरातत्त्व विभागाला दिल्या होत्या. तो अहवाल पुरातत्त्व विभागाने युनेस्कोकडे तीन वर्षांपूर्वी पाठविलाही होता; पण त्या समितीने पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे पुरातत्त्व विभाग याबाबत निर्णय घेऊ शकले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अजिंठा लेणीत ९० ठिकाणे बनली धोकादायक!
By admin | Published: September 23, 2014 4:52 AM