औरंगाबाद : थायलंड प्रिसेंसच्या भगिनी सराली व त्यांच्या 22 उपासकांनी भंते आर्यवांग्सो महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली जगप्रसिद्ध अजिंठा लेणींवर माहितीपट तयार केला असून, तो लवकरच थायलंडच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर लवकरच झळकणार आहे. यासाठी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापकांचा हा चमू 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान शहरात होता.
लेणींची प्रसिद्धी थायलंडच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर ‘थाई’ भाषेतून होणार असल्यामुळे पर्यटनवाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी जपानी व कोरियन पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. काही वर्षापासून थायलंडचे पर्यटकांचीही संख्या वाढत आह़े शिवाय काही प्रमाणात चीनी पर्यटकदेखील लेणींकडे आकर्षित होत आहेत.
आर्यवांग्सो महाथेरो हे 8 वर्षापासून थायलंड राजघराण्याशी निगडीत आहेत. राजघराण्याचे सर्व धार्मिक कार्यक्रम त्यांच्या हस्ते होतात. त्यांना ‘थाई’ भाषा अवगत असून, या माहितीपटात त्यांनी त्या भाषेतच लेणीचे महत्त्व विशद केले. याकामी नागपूर एनआयटीचे चेअरमन डॉ.हर्षदीप कांबळे यांनी थायलंडच्या ग्रुपला सहकार्य केले. (प्रतिनिधी)