मुंबई- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी दुःख व्यक्त केलं. विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनाने एक अजातशत्रू नेता आपल्यातून निघून गेला. त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना!, असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.ठाण्यातील हरी निवास येथील गिरीराज हाइट्समध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डावखरे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 1980 साली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डावखरे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असतानाही काही भाजपाच्या नगरसेवकांशी मैत्रीचा हात पुढे करून त्यांनी 1987मध्ये प्रथमच महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आणली. काही काळ त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषविले. 1992 साली डावखरे राज्य विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर सलग 18 वर्षे त्यांनी परिषदेचे उपसभापती पद भूषविले. राजकारणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला. डावखरे यांचे कै. आनंद दिघे आणि त्यांची राजकारणापलीकडची मैत्रीही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेत राहिली. 1986-87 साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेचे सतीश प्रधान त्या वेळी महापौर होते. शिवसेनेची सत्ता असतानाही भाजपाचे देवराम भोईर, सुभाष भोईर आणि गोवर्धन भगत यांच्याशी त्यांनी मैत्री केली. भाजपाच्या पाचपैकी तिघांनी काँग्रेसला मदत केल्यामुळे शिवसेना-भाजपा मिळून, 32 तर काँग्रेसचे संख्याबळही समसमान अर्थात 32 झाले. तेव्हा जनता पक्षाचे दशरथ पाटील यांचे 33वे मत मिळवून डावखरे महापौर झाले. 1987 ते 1993 पर्यंत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. 1992मध्ये ते राज्य विधान परिषदेवर निवडून आले.