मुंबई : सत्र न्यायालयाने मंगळवारी एका ‘सीरियल मोलेस्टर’ला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तीन वर्षांपूर्वी एका दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी त्याला डी.एन. नगर पोलिसांनी अटक केली होती. त्याचा कसून तपास करत सबळ पुरावे न्यायालयात सादर करून त्याला शिक्षा मिळवून देण्यात डी. एन. नगर पोलिसांनी कौतुकास्पद भूमिका निभावली.अंधेरीत घरामागे खेळणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीचे अय्याझ मोहम्मद अली अन्सारी उर्फ काण्याने अपहरण केले. त्यानंतर याच परिसरातील आशिष इमारतीच्या बाजूला एका निर्जन परिसरात चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत बलात्कार केला. जानेवारी, २०१४ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी काण्याविरोधात अपहरण, अनैसर्गिक अत्याचार, बलात्कार आणि पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून तो फरार होता. त्यानंतर त्याच्या मागावर असलेल्या डी.एन. नगर पोलिसांनी १६ एप्रिल, २०१४ रोजी काण्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर दाखल असलेल्या २० ते २२ गंभीर गुन्ह्यांपैकी १४ गुन्हे हे बलात्कार आणि विनयभंगाचे असल्याचे डी.एन. नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. त्यात वर्सोवा, डी.एन. नगर, जुहू, अंधेरी, वाकोला, ओशिवरा या पोलीस स्टेशनचा समावेश असल्याचे त्याच्या अटकेमुळे उघड झाले. तेव्हापासून त्याच्यावर कोर्टात खटला सुरू होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक क्षीरसागर, देसाई आणि कॉन्स्टेबल कदम हे तपास करत होते. त्यानुसार काण्याच्या विरोधात त्यांनी सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा केले. सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्यानुसार विशेष सत्र न्यायालयाने त्याला मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. काण्याची परिसरात दहशत होती. त्याने या खटल्यादरम्यान अनेकांना धमकाविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. या कामगिरीबाबत स्थानिकांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)
‘सराईत गुन्हेगारा’ला आजन्म कारावास
By admin | Published: April 05, 2017 2:39 AM