दिवाळीत रेशनकार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यासह विविध निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत. परंतू, राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजच्या बैठकीला गैरहजर होते, ते नाराज तर नाहीएत ना अशी चर्चा रंगली आहे.
वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवाला विविध राजकीय नेते, बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतू अजित पवार तिकडे गेले नव्हते. तेव्हापासून अजित पवार नाराज असल्याचा चर्चा होत्या. त्यातच आजच्या बैठकीला अजितदादा न आल्याने पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
अजित पवार हे देवगिरी बंगल्यावर होते. तरीही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला का आले नाहीत, तर यामागे ते आजारी असल्याचे सांगण्यात आले. अजित पवार आजारी असल्याने बैठकीला आले नाहीत. काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजाच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातही खडाजंगी झाली होती.
अजित पवारांची तब्येत आज ठीक नाहीय. त्यामुळे ते कॅबिनेट बैठकीला आलेले नाहीत. त्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
आजच्या बैठकीतील निर्णय...१. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश... ( अन्न व नागरी पुरवठा)
२. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ...( ऊर्जा विभाग)
३. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ... (अल्पसंख्याक विकास विभाग)
४. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी... (विधी व न्याय)
५. इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा...( गृहनिर्माण)