काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे हे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. परंतू, त्यांनी वारंवार निरोप देऊनही शिंदेंनी भेट दिली नाही. यामुळे ते तेथून निघून गेल्याचा प्रकार घडला होता. आज दुपारी अजित पवारांच्या बाबतही असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईत आज फिफाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे अजित पवार वेळेवर कार्यक्रमाला पोहोचले. दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम सुरु होणार होता. परंतू, तीन तास झाले तरी शिंदे आणि फडणवीस कार्यक्रमाला आले नाहीत. यामुळे अजित पवार तीन तास त्यांची वाट पाहत कार्यक्रमस्थळी थांबले होते. अखेर कंटाळून अजित पवार निघून गेल्याचा प्रकार घडला आहे.
अजित पवार निघून गेल्यावर शिंदे आणि फडणवीस जोडगोळी कार्यक्रमाच्या ठिकाणी आली. यानंतर कार्यक्रम सुरु झाला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठक लांबल्याने उशीर झाल्याचे कारण दिले आहे. परंतू, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.
संभाजीराजेंसोबत काय घडलेले...मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी गेल्या आठवड्यात गुरुवारी दुपारी छत्रपती संभाजीराजे मुंबईला गेले होते. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले असता त्यांना दीड ते दोन तास ताटकळत रहावे लागले. शिंदे यांनी भेट न दिल्याने छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेल्याचा प्रकार घडला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास माजी खासदार संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले. संभाजीराजेंनी त्यांना वारंवार निरोप देऊनही शिंदेंनी भेट दिली नाही.