मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार, या चर्चेने सोमवारी पुन्हा जोर धरला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड (जि. पुणे) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले. दुपारनंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याच्या चर्चेने जोर धरला. दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाही त्यांनी चुप्पी साधल्याने चर्चेला बळच मिळाले. परंतु, चर्चा वाढल्यानंतर रात्री त्यांनी खुलासा केला. चर्चेवर तात्पुरता पडदा पडला.
अजित पवार काय म्हणाले? खारघर येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या तसेच उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे, असा खुलासा अजित पवार यांनी ट्विट करत केला आहे. तसेच मंगळवारी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम कायमअजित पवारांनी हा खुलासा केला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. २०१९ रोजी अजित पवारांनी पहाटे राजभवनभर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हाही असे काही घडेल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटले नव्हते. तसेच यापूर्वी त्यांनी अचानक अनेक राजकीय धक्के दिलेले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चेत तथ्य असावे, असा संशय राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. यासंदर्भात पक्षातील एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, अजित पवार पुढे येऊन जोपर्यंत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत हा संभ्रम कायम राहणार आहे.
राज्यासमोर आज अनेक आव्हाने आहेत, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. काल दादा नागपूरला महाविकास आघाडीच्या मेळाव्याला हजर होते. एखादा कार्यक्रम रद्द केला तर त्याची चर्चा करण्याची गरज नाही. मला गॉसीपला वेळ मिळत नाही आणि मी वास्तवतेत जगते. दादा २४ तास काम करतात, ते कामात व्यस्त असल्याने माध्यमांशी कमी बोलतात हे तुम्हालाही माहीत आहे. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
चर्चा निरर्थक : मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, हा खुलासा करीत अजित पवारांनी या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून वेगळ्या दिशेने जातील असे मला वाटत नाही - संजय राऊत, शिवसेना नेते
भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे आगामी विधानसभेत २०० प्लस जागा जिंकण्याचे टार्गेट आहे. ते २१५-२५० पर्यंत जाण्यास कुणी मदत करणार असेल तर आम्ही स्वागतच करू. - शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री
अजून तरी तसे काही नाही आणि आनंदाची गोष्ट समजली तर तुम्हाला सांगेनच. - अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी आमदार
अजित पवार भाजपबरोबर जाणार असतील आणि राष्ट्रवादी जाणार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार यात काही शंका नाही. - माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी आमदार