- सुनील चावके नवी दिल्ली : येत्या महिन्याभरात राज्याच्या राजकारणात होऊ घातलेल्या उलथापालथीचे सर्वात मोठे लाभार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार ठरण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी ‘अच्छे दिन’ वाट्याला येऊन अजित पवार राज्याच्या राजकारणात हुकुमाचा एक्का ठरू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेल्या सत्तासंघर्षावर बहुप्रतिक्षित निकालाची घडी जवळ आल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या गोटात चलबिचल वाढली आहे. निकाल आमच्याच बाजूने लागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर राहील, असा दावा करण्यात येत असला तरी १६ आमदारांच्या संभाव्य अपात्रतेच्या शक्यतेमुळे भाजप-शिवसेना गोटात अस्वस्थता आहे. परिणामी, येत्या १५ मे पूर्वी कधीही लागू शकणाऱ्या या निकालापूर्वी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नजरा अजित पवार यांच्यावर खिळल्या आहेत.शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे मनसुबे उघड करून या शक्यतेला तूर्तास विराम दिला असला तरी तो अजित पवार यांचा भाव वधारण्यात हातभार लावणाराच ठरणार आहे.
भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी दडपणअजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करावी म्हणून त्यांच्यावर कमालीचे दडपण असल्याचे त्यांच्या निकटस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी भाजपसोबत मजबुरीपोटी जायची वेळ आल्यास अजित पवार यांना भाजपश्रेष्ठींच्या अटी-शर्ती मान्य कराव्या लागतील. त्या स्थितीत त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होईलच याची शाश्वती नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यातील सत्ता शाबूत ठेवण्यासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना महत्त्वाची खाती देण्याच्या शर्ती मान्य करण्याची वेळ भाजपवर येऊ शकते.
शक्यता काय आहेत?- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाल्यास महाविकास आघाडीकडून अजित पवार हेच मुख्यमंत्रिपदाचे निर्विवाद दावेदार ठरणार असल्याचे संकेत मविआच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिले आहेत.- दिल्लीतील भाजपश्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४० हून अधिक जागा जिंकणे अनिवार्य आहे. - राज्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या अजित पवारांची साथ लाभल्याशिवाय भाजपला हे लक्ष्य साध्य करणे शक्य नाही.