हिजाब वादावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 01:05 PM2022-02-11T13:05:27+5:302022-02-11T13:08:28+5:30
अजित पवार म्हणाले की, काही लोक हिजाब वादातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडायला शिकवत नाही.
मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद राज्यात उमटू लागले असून महाराष्ट्रातही काही ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर समाजात आणखी फूट पडेल अशा घटना टाळायला हव्यात, असे आवाहन करतानाच काही लोक या प्रकरणात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले की, काही लोक हिजाब वादातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडायला शिकवत नाही.
आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी असताना तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करायला हवा. कोणी तरी एखादा व्हिडीओ व्हायरल करतो, त्यावरून दुसरा ट्विट करतो. काऊंटर ट्विट सुरू होतात आणि निष्कारण विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सर्वांनी समंजस भूमिका घेऊन संयम ठेवला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले.
महाराष्ट्रात अशांतता नको - गृहमंत्री वळसे-पाटील
- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही कर्नाटकातील वादातून महाराष्ट्रात आंदोलन करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
- शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थेत असे वाद आणू नयेत. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत.
- दुसऱ्या राज्यातील एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही.
- राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. सर्वांनी शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.