समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या आमदारांनीही त्यांनी न्याय दिला नव्हता. स्वतःसह तिघांकडे जास्त निधी ठेवला होता. म्हणून या तिघांचा निधी कमी केला असे स्पष्टीकरण पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, अजित पवार यांना ८० कोटी, वळसे पाटील यांना ६० कोटी, भरणे यांना ४० कोटी असा निधी आणि इतर आमदारांना दहा, बारा कोटी कसा निधी देण्यात आला होता. मी इतर कोणाचाही निधी कमी केला नाही. परंतू या तिघांचा निधी निम्म्यावर आणला. गरज पडल्यास त्यांना तो नंतर दिला जाईल. मी कधीही विकासकामांमध्ये राजकारण आणत नाही.
पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासनाने ७५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरूवात झाली आहे. गुजरातची निवडणूक जाहीर झाल्याने आमच्या प्रथेप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातील अनेक नेते तिकडे प्रचारासाठी जाणार आहाेत. एखादी निवडणूक आम्ही युध्दाप्रमाणे नियोजन करून लढवतो. महाराष्ट्र, कर्नाटकच्या राज्यपालांनी पुढाकार घेवून कोल्हापूरमध्ये बैठक घेतल्याने सीमाभागातील अनेक गावांचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी वातावरण निर्माण होणार आहे.