NCP Ajit Pawar: पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातवाईकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संपर्क साधून विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद व सुरक्षीत परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेवर ठेवले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशीदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना मदतीसह धीर दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठीही अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.