Ajit Pawar Deepak Kesarkar: विधानसभा निवडणुका २०१९ मध्ये पार पडल्या. त्यानंतर अचानक राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या वेळी राजभवनात शपथविधी केल्याचे साऱ्यांच्याच लक्षात असेल. त्यानंतर पुन्हा दीड दिवसांत ही हातमिळवणी संपली आणि मग महाविकास आघाडी सत्तेत आली. हे सारं सुरू असताना अडीच वर्षानंतर, एकनाथ शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि भाजपासोबत सत्तास्थापन केली. शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. या साऱ्या रणधुमाळीनंतर, नुकतेच भाजपाचे आमदार प्रवीण पोटे यांनी केलेले विधान चर्चेत होते. त्यात भर म्हणून, रविवारी शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसतंय.
भाजपाचे प्रविण पोटे काय म्हणाले होते?
अजित पवार मागील काही काळापासून राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आपण नाराज नसल्याचे अजितदादांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. पण तरीही काही चर्चा या सुरूच आहेत. तशातच नुकतेच अजित पवार आणि भाजपा आमदार प्रवीण पोटे शनिवारी अमरावतीत एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर होते. यावेळी प्रवीण पोटे म्हणाले की, अजित पवारांनी पहाटेच्या ऐवजी दुपारी शपथ घेतली असती, तर ते आता मुख्यमंत्री असते. त्यांच्या या विधानावर चर्चा झाली नसती तरच नवल. अपेक्षेप्रमाणे या विधानावर चांगलीच चर्चा रंगली.
शिंदे गटाचे दीपक केसरकर काय म्हणाले?
प्रविण पोटे यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेले विधान याचा संदर्भ घेत, दीपक केसरकरांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केसरकरांनी केलेल्या विधानाने तर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. "राजकीय नेत्यांची मैत्री ही राजकारणापलीकडची असते. त्यामुळे काही ठिकाणी राजकीय नेतेमंडळी एकमेकांबद्दल जे बोलतात त्यात आदर आणि आपुलकी असते. आम्हाला सगळ्यांना अजित पवारांबद्दल आदर आहे. अजित पवार देखील आमच्याशी बोलताना, कुटुंबातील सदस्याप्रमाणे मनमोकळेपणाने बोलतात. त्यामुळे अजित पवार जर आमच्याबरोबर शिंदे गटात आले तर आम्हाला आनंदच होईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कशी घुसमट होतेय, हे सगळ्यांनी बघितलं आहे. अशा वेळी त्यांच्यासारखा उमदा नेता आमच्यासोबत असेल तर का आवडणार नाही?” असे केसरकर म्हणाले. बंडखोरी करताना ज्या अजित पवारांबाबत उघडपणे शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती, त्यांच्याबाबत आता असे विधान केल्याने त्याची राजकीय वर्तुळात नक्कीच चर्चा आहे.