ठाणे - अजितदादा आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कुणी तोडू शकत नाही. ७२ तासांचा रेकॉर्ड आहेच, पण एकाच टर्ममध्ये मी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्रीही झालो. अजितदादा एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले आणि परत उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राजकारणात अनेक रेकॉर्ड होतात. पण जो रेकॉर्ड एकनाथ शिंदेंनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे असं भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करताच गडकरी रंगायतन सभागृहात हशा पिकला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित 'योद्धा कर्मयोगी' या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्तापक्षातून बाहेर पडायचं आणि विरोधी पक्षासोबत जायचं, मग सत्ता तयार करायची अशी हिंमत एकनाथ शिंदेंनी दाखवली, ती हिंमत या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते. आम्ही दोघांनी अनेकदा एकत्र काम केले. आमचे संबंध चांगले राहिलेत. पहिल्या दिवशीपासून एकमेकांवरील विश्वास निर्माण झाला. त्यामुळे वेगवेगळ्या पदावर काम करतानाही तोच विश्वास कायम राहिला. जेव्हा राज्यात बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व संपवण्याचा विचार होतोय तेव्हा वेगवेगळ्या बाकांवरील आम्ही एकत्रित आलो आणि सरकार स्थापन केले. हे सरकार इतकं प्रभावी झाले त्यामुळे आमच्याकडे अजितदादाही आले असं त्यांनी सांगितले.
तसेच या संपूर्ण पुस्तकात एकनाथ शिंदेंचा जीवनप्रवास पाहायला मिळतो. पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर वडील संभाजीराव आणि आई वाळकेश्वरमध्येच राहायचे. त्यावेळीस कुणाला माहिती नसेल वाळकेश्वरच्या छोट्या घरात राहणारे, त्यांचा मुलगा त्या वाळकेश्वरमध्ये वर्षा बंगल्यावर राहायला जाईल असं कुणाला वाटलं नाही. त्यांनी ज्यारितीने एकनाथ शिंदेंना घडवलं त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. आरएसएस, आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात ते आले. दिघेंनी एकनाथ शिंदेंच्या आयुष्याला वळण गेले. जीवनातील सर्वात वाईट प्रसंग त्यांच्यावर आल्यानंतर त्यातून बाहेर काढण्याचं काम दिघेंनी करत शिंदेमध्ये ऊर्जा भरली. त्यानंतर समाजसेवेसाठी उतरलेले एकनाथ शिंदे सातत्याने पुढे पुढे जात राहिले असं देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केले.
दरम्यान, आपल्या जीवनात पडेल ते काम शिंदेंनी केले. आवश्यकता पडली म्हणून रिक्षाही चालवली. हे करतानाच मराठी माणसांसाठी लढण्याची एक वृत्ती, जो बाणा शिवसेनाप्रमुखांनी तयार केला. देव, देश आणि धर्माची लढाई आपल्याला लढायची आहे या सर्व गोष्टींचा परिणाम एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिमत्वावर झाल्याचं दिसून येते. लोकांमध्ये राहणारी व्यक्ती असं त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून एक गोष्ट शिकण्याची आहे ती म्हणजे पेशन्स, समोरच्याचे शांत एक तास, दोन तास, चार तास ऐकून घेऊ शकतात. पण ज्यावेळी त्यांचा पेशन्स संपतो तेव्हा ते कुणाचेही ऐकत नाही हेदेखील खरे आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.