अजित पवार, गणेश नाईक दोघेच 'डबल लक्षाधीश'; विधानसभा निवडणुकांमध्ये असेही रेकॉर्ड
By यदू जोशी | Published: October 23, 2024 01:33 PM2024-10-23T13:33:09+5:302024-10-23T13:34:01+5:30
एक लाखांहून अधिक मताधिक्याने आजवर राज्यात ११ वेळा विजय
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यावेळी पुन्हा भाजपकडून उमेदवारी मिळालेले माजी मंत्री गणेश नाईक हे महाराष्ट्राच्या इतिहासातील दोनच नेते असे आहेत की जे एक लाखाहून अधिक मतांनी दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले.
आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात ११ वेळा एक लाखांहून अधिकच्या मतफरकाने विधानसभेत विजय मिळविण्यात आला. अजित पवार हे बारामती मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आले आहेत. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी १ लाख २ हजार ७९७ मतांनी विजय मिळविला होता. त्यांना १ लाख २८ हजार ५४४ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष रंजनकुमार तावरे यांना २५ हजार ७४७ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार १ लाख ६५ हजार २६५ मतांनी जिंकले. हा आजवरचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रेकॉर्ड आहे. त्यावेळी विरोधात होते भाजपचे गोपीचंद पडळकर; त्यांना ३० हजार ३७६ मते मिळाली होती.
वडील, मुलगा लाखाहून अधिकच्या फरकाने जिंकले!
- माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम आणि त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. पिता-पुत्र लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्याचे राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे.
- डॉ. पतंगराव कदम हे २००४ मध्ये सांगली जिल्ह्याच्या भिलवडी वांगी मतदारसंघातून १ लाख १ हजार ९०० मतांनी विजयी झाले होते. डॉ. कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी २०१९ मध्येच पोटनिवडणूक झाली होती.
- पलूस कडेगावच्या २०१९ मधील या पोटनिवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित हे १ लाख ६२ हजार ५२१ मतांनी विजयी झाले होते.
एक लाखाहून अधिक मतांनी आजवर जिंकलेले उमेदवार
उमेदवार मतदारसंघ (पक्ष) वर्ष मताधिक्य
- डॉ. पतंगराव कदम भिलवडी वांगी (काँग्रेस) २००९ १,०१,९००
- अजित पवार बारामती (राष्ट्रवादी) २००९ १,०२,७०७
- अजित पवार बारामती (राष्ट्रवादी) २०१९ १,६५,२६५
- विजयसिंह मोहिते पाटील माळशिरस (राष्ट्रवादी) २००४ १,०४,७१२
- शिवेंद्रराजे भोसले सातारा (राष्ट्रवादी) २००९ १,०५,७७८
- अशोक चव्हाण भोकर (काँग्रेस) २००९ १,०७,५०३
- गणेश नाईक बेलापूर (शिवसेना) १९९५ १,०९,००१
- गणेश नाईक बेलापूर (राष्ट्रवादी) २००४ १,१८,२७६
- धीरज देशमुख लातूर ग्रामीण (काँग्रेस) २०१९ १,२१,४८२
- किसन कथोरे मुरबाड (भाजप) २०१९ १,३६,०४०
- विश्वजित कदम पलूस कडेगाव (काँग्रेस) २०१९ १,६२,५२१