अजित पवारांच्या घरावर धाडी, सुप्रिया सेफ; हे कसं काय? राज यांच्या आरोपांवर पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 02:15 PM2022-04-13T14:15:33+5:302022-04-13T14:16:11+5:30
अजित पवार आणि त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरावर धाडी पडतात, पण सुप्रिया सुळेंच्या घरावर धाड पडत नाही; राज ठाकरेंच्या विधानाला पवारांचं थेट उत्तर
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरावर, त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरावर छापे पडत नाहीत, असं का, असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या सभेत उपस्थित केला. शरद पवार स्वत:च्या मुलीला वाचवतात आणि पुतण्याला अडकवतात, असा राज यांच्या विधानाचा रोख होता. राज यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार कोणी तिसरे आहेत का?
अजित पवारांच्या घरी, त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरांवर धाडी पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरांवर धाडी पडत नाहीत, यामागचं कारण काय, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज यांचा हा आरोप राजकीय नव्हे, तर वैयक्तिक स्वरुपाचा असल्याचं पवार म्हणाले.
अजित पवारांच्या घरावर छापे पडतात. पण सुप्रिया सुळेंच्या घरावर पडत नाहीत. असं का होतं? हा काय प्रश्न आहे का? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला. धाडी कोणाकडे पडणार ते आम्ही ठरवतो का? असा प्रश्न पवारांनी विचारला. अजित पवार कोणी तिसरे आहेत का? अजित आणि सुप्रिया ही भावंडं आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज यांनी केलेला आरोप वैयक्तिक स्वरुपाचा आहे, तो राजकीय नाही, असं पवारांनी म्हटलं.
जातीयवाद वाढवल्याच्या आरोपाला उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरेंनी काल पुन्हा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर संभाजी बिग्रेडसारख्या संस्था निर्माण झाल्या. हा निव्वळ योगायोग नाही, असं राज म्हणाले. त्यावर राष्ट्रवादीचा इतिहास तपासून पाहा. विविध जातीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारा हा पक्ष आहे. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, मधुकर पिचड या नेत्यांनी पक्षात महत्त्वाची पदं भूषवली आहेत, असं पवारांनी सांगितलं.