मुंडे साहेबांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली. भुजबळांना दिली गेली. पण गोपीचंद पडळकर संपला पाहिजे, अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर त्यावर लक्ष घालावे. यामध्ये सरकारचा थेट संबंध आहे. पोलीस काय यांच्या बापाचे आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच आज जे जात्यात आहेत, ते उद्या सुपात जाती, परिस्थिती बदलते, असा सूचक इशारा देखील विधानसभेत दिला. यावर तातडीने अजित पवारांनी उत्तर देत पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
विधान मंडळाच्या सदस्याचा जीव धोक्यात आहे. सरकारमधले विचारतात पोलीस सुरक्षा कशाला घेता. मला त्यांना विचारायचे आहे, पोलीस त्यांच्या बापाचे आहेत का? आम्हाला हा महाराष्ट्र ठेवायचा आहे, पश्चिम बंगाल करायचा नाहीय. एका आमदाराचा जीव जात असताना आम्ही शांत बसू शकत नाही. त्या पोलीस अधिकाऱ्यांवर बदली आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, आजचे कामकाज थांबवा आणि आम्हाला दालनाता बोलवा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर अजित पवारांनी फडणवीसांच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिले.
प्रत्येक माणसाला संरक्षण देणे सरकारची जबाबदारी आहे. राज्यकर्ते कोणीही असले तरी त्यात दुमत नाही. मला राज्यातील जनता गेली तीस वर्षे ओळखते. तरी काहीजण बोलतात की अजित पवारकडे जबाबदारी दिली तर तो चार दिवसांत राज्य विकून खाईल, अरे काय बोलता? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
मी कोणाच्या अध्यात मध्यात नसतो, फक्त कोणाही पक्षाचा नेता, कार्यकर्ता आला तर विकासाच्या कामांमध्ये लक्ष घालतो. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी विधानसभेत, परिषदेत लोकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं, तेव्हा तारतम्य ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. फडणवीसांनी मुंडे साहेबांचे उदाहरण दिले, पवार साहेबांची भूमिका माहिती आहेच. संरक्षण देण्याची भूमिका आहेच. शंभुराज देसाईंशी त्यावर बोललो आहे. फडणवीसांनी आता अधिकची माहिती दिली आहे, त्यावरून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.