अजित पवार दिल्लीत पोहोचले, अमित शाह चंदीगडला निघून गेले; महायुतीत राजकारण रंगले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 09:23 AM2024-12-03T09:23:30+5:302024-12-03T09:24:12+5:30
Ajit pawar in Delhi: शिंदेंनी नाराज नसल्याचे स्पष्ट केलेले असले तरी त्यांचे असे अचानक आजारी पडणे व महायुतीच्या चर्चेच्या बैठका एकदा नाही तर दोनदा रद्द करणे हे महायुतीत काहीतरी कुरबुर सुरु असल्याचे संकेत देत आहे.
मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंनी नाराज नसल्याचे स्पष्ट केलेले असले तरी त्यांचे असे अचानक आजारी पडणे व महायुतीच्या चर्चेच्या बैठका एकदा नाही तर दोनदा रद्द करणे हे महायुतीत काहीतरी कुरबुर सुरु असल्याचे संकेत देत आहे. अशातच भाजपा २०, शिंदे १३ आणि अजित पवार गटाला १२ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंनी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात अजित पवारांच्या ताब्यातील अर्थखाते, भाजपाच्या वाट्याचे गृहखाते मागितले आहे.
यामुळे आपली खाती कमी होऊ नयेत किंवा जास्तीचे पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार सोमवारी दिल्लीला पोहोचले होते. परंतू, अमित शाह हे जवळच असलेल्या चंदीगढला निघून गेल्याचे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांना अमित शाह यांची भेट घेता आलेली नाही. यामुळे अजित पवार त्यांचे पूत्र पार्थ पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शाह दिल्लीत कधी परततात याची वाट पाहत थांबले आहेत, असे समजते आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय नेतृत्व धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतू अजित पवारांनी शिंदेंची बार्गेनिंग पावर कमी करण्यासाठी शरद पवारांचा २०१४ चा डाव टाकत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देऊन टाकला आहे. यावरूनही केंद्रात भाजपाचे नेते नाराज असल्याचे कयास बांधले जात आहेत.
अजित पवार सोमवारी दिल्लीत पोहोचले. चंदीगढ दिल्लीपासून तसे जवळच आहे. आज पंतप्रधान मोदी आणि शाह यांना एका कार्यक्रमाला उपस्थित रहायचे आहे. मोदी आज चंदीगढला जाणार आहेत. परंतू अमित शाह हे सोमवारी रात्रीच चंदीगढला निघून आले आहेत. शाह अजित पवारांना भेटू शकले असते, परंतू ते चंदीगढला निघून गेल्याने राजकीय वर्तुळात अजित पवारांना भेटीची वेळ दिली नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.