Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार रंगत येऊ लागली आहे. दोन्ही पवार कुटुंबीय मतदारसंघात फिरताना दिसत आहे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत. यावरूनच अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला आणि विधानसभा निवडणूक झाल्यावर काकींना विचारणार की, तु्म्हाला एवढा काय पुळका आला होता, त्या नातवाचा?, असे अजित पवार म्हणाले.
पानसरे वाडी येथील ग्रामस्थांशी अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "मला पानसरेवाडीकरांना काही गोष्टी सांगायच्या आहेत. गावच्या पुढाऱ्यांचा राग काही माझ्यावर काढू नका. मी काही चुका केलेल्या नाहीत. मी असायचो मुंबईत. मी मुंबईतून योजना मंजूर करायचो. पैसे मंजूर करायचो, तुम्हाला पाठवायचो. तालुक्याच्या पुढाऱ्यांची नाराजीही माझ्यावर काढू नका."
ही साहेबांची निवडणूक आहे का? अजित पवार
"भावनिक होऊ नका. कुणीतरी मला म्हटलं की, त्यांनी काय केलंय की, साहेबांचा (शरद पवार) मोठा फोटो लावला आहे आणि त्यांची खूण (निवडणूक चिन्ह) लावली आहे. साहेबांची निवडणूकच नाहीये ना. साहेबांची निवडणूक आहे का?", असा सवाल अजित पवारांनी केला. मी गंजेडी, पिदाडा असतो, गोष्ट वेगळी होती -अजित पवार
"तुम्ही मला १९९१ पासून आमदार केलं. खासदार केलं. तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या का? आताच... काय नातवाचा पुळका आलाय, मला तर काही कळत नाही. जर मी खादाडा, पिदाडा, गंजेडी असतो, तर वेगळी गोष्ट... याने वाटोळं केलं बारामतीचं. हा फार बाद झालेला आहे. असं काही असतं, तर गोष्ट बरोबर आहे. माझं काय झालंय की, मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो आहे माझा पुतण्या. तो आहे मुलासारखा. पुन्हा आम्हीच आमच्या घरातील एकमेकांची निकाती करतोय असं होईल", असे मिश्कील विधान अजित पवारांनी केले.
"मी पुन्हा तुम्हाला सांगतो भावनिक त्याठिकाणी होऊ नका. काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे की, काय एवढा पुळका आला त्या नातवाचा तुम्हाला? त्यावेळी मी विचारेन. आता विचारण्याची वेळ नाही. कधीही आपल्या बारामतीमध्ये ही गोष्ट केली नाही", असे अजित पवार ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले.