मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे पवार कुटुंबियांमध्येही तणावाचे वातावरण आहे. अजित पवार यांच्यासह ८ दिग्गज नेत्यांनी शरद पवारांविरोधात भूमिका घेत थेट सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी केवळ शरद पवारांविरोधात बंड केले नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये तणाव आहे. अजित पवारांनी पहिल्याच भाषणात शरद पवारांवर वैयक्तिक निशाणा साधला होता. त्यामुळे आता हा कौटुंबिक तणाव कुठेतरी कमी व्हावा यासाठी पवार कुटुंबियांमध्ये नातेवाईकांच्या गाठीभेटी सुरू आहेत.
अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी गेल्याची माहिती आहे. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहे. अजित पवार आणि शरद पवार यांचा राजकीय मार्ग वेगळा झाला असला तरी पवार कुटुंबिय एक आहे. २०१९ मध्ये जेव्हा अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी घेतला त्यानंतर अजित पवारांना माघारी आणण्यामध्ये पवार कुटुंबियांने मोलाची भूमिका बजावली.
अजित पवार यांनी पुन्हा राजकीय भूमिका घेत शरद पवारांविरोधात बंड केले. त्यात आता पवार कुटुंबियांमध्ये भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे. २०१९ ला अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी नेते श्रीनिवास पवार यांच्याच घरी गेले होते. सध्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार आमनेसामने आले आहेत. राजकीय वाद असले तरी कौटुंबिक नाते तसेच राहावे यासाठी कुटुंबियांकडून काही हालचाली सुरू आहेत हीदेखील चर्चा आहे.
दरम्यान, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे पवार कुटुंबातील भेटीगाठीमुळे अजित पवार-शरद पवार यांच्यातील कौटुंबिक संबंध सुधारले तरी राजकीय संबंध सुरळीत होतील का याकडेही पाहणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीत फूट पडून आठवडा झाला आहे. या कालावधीत शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत पवारांचे विश्वासू मानले जाणारे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यासारखे दिग्गज नेते पक्षाविरोधात गेले. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसले.