"कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे, ते...", अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 11:35 AM2022-09-09T11:35:01+5:302022-09-09T11:36:02+5:30
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.
पुणे : गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेबारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 2024 साली बारामतीचा खासदार हा भाजपचाच असेल असा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काटेवाडी गावात आयोजित केलेल्या बूथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्धार व्यक्त केल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, 2019 ची एक आठवण करून देत खोचक टोला देखील लगावला आहे. अजित पवार म्हणाले, "आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात. गेल्या 55 वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगले माहित आहे की, कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे. ते त्या निवडणुकीत त्यांचे काम चोखपणे बजावतील. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही."
याचबरोबर, "बारामतीमध्ये माझे काम बोलते. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील. मला प्रदेशाध्यक्षांना एक प्रश्न विचारायचे आहे की, तुम्ही एवढे संघटनेत काम करणारे, पक्षाच्या जवळचे होता, तर तुम्हाला, तुमच्या पत्नीला 2019 ला उमेदवारी का नाकारली? त्याचे उत्तर द्या. त्याचे उत्तर कुणी देऊ शकत नाही. अर्थात, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण माझे मत आहे की कुणीही बारामतीत यावे. बारामतीकर सर्वांचे स्वागतच करतात. पण मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचे, कुठं बटण दाबायचे, हे बारामतीकरांना खूप चांगले माहिती आहे", अशा शब्दांत अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला.
याशिवाय, प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना एक हुरूप येतो. आपण काहीतरी करतो वगैरे. पण, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते ही वस्तुस्थिती आहे. ते अध्यक्ष बारामतीला न जाता दुसरीकडे गेले असते, तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते बारामतीला गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला एवढी प्रसिद्धी मिळाली, असा टोलाही अजित पवारांनी हाणला.
दरम्यान, गेल्या मंगळवारी दिवसभर बारामती दौऱ्यावर असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या काटेवाडी शाखेचे उद्घाटन केले. यावेळी आमदार राहुल कुल गोपीचंद पडळकर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. यादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. तसेच, 2024 साली बारामतीचा खासदार हा भाजपचाच असेल असा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.