ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १३ - अण्णासाहेब साठे महामंडळात ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांच्याबरोबरीने आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जेलमध्ये टाकणारच, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर सभेत सांगितले. भांडगाव (ता. दौड) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते. या वेळी कांबळे यांनी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सर्व घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेलमध्ये टाकणार असल्याने मला वेगळे निरोप पाठवण्याचे काम सुरू आहे. मात्र, मी कसल्याही दादागिरीला घबरणारा नाही. महाराष्ट्राच्या जनतेची ज्यांनी लूट केली, त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्याच्या यापूर्वीच्या कारभाऱ्यांनी केवळ लुटण्याचे काम केले आहे.लक्ष्मण दोरगे व उपसरपंच रवींद्र दोरगे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, भीमा-पाटस कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुरेश शेळके, अप्पासाहेब हंडाळ, तानाजी दिवेकर, तात्यासाहेब ताम्हाणे, लक्ष्मण काटकर, भांडगावच्या सरपंच कमल टेळे, उपसरपंच रवींद्र दोरगे, बाळासाहेब लाटकर, मनोज फडतरे, उत्तम गायकवाड, रोहिदास दोरगे, दत्तात्रय दोरगे, राहुल खळदकर, बाबासाहेब दोरगे, विजय दोरगे, पिलू गडधे, शीतल दोरगे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.आमदार राहुल कुल यांनी भांडगाव येथील शेतकऱ्यांना महामार्गावरील सर्वांत जास्त नुकसानभरपाई मिळेल, यासाठी खास उपाययोजना करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात भांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या, अंगणवाडी इमारत, जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत कामे, पालखी मार्ग आदींचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. या वेळी भाजपाचे वासुदेव काळे, तानाजी दिवेकर यांचीदेखील भाषणे झाली. रामदास दोरगे यांनी आभार मानले.
मंत्रिमंडळात प्रमोशन मिळणार, याची कसलीही चिंता आपल्याला वाटत नाही. भाजपाने सर्वसामान्य कार्यकर्ता असतानादेखील अनेक पदे दिली. यात आपण समाधानी आहोत. मात्र दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद देणार असल्याचे रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जाहीर सभेतून सांगितले होते. त्यामुळे त्यांनी राहुल कुल यांना मंत्रिपद देऊन शब्द पाळावा, असे त्यांना सांगणार असल्याचे काळे यांनी सांगितले.