भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षांची आघाडी आहे. शेतकरी कामगार पक्षासारखे काही आणखी पक्षही येतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. याचबरोबर अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहणार असल्याचा टोला पवारांनी हाणला आहे.
छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांनी उत्तर दिले आहे. आमच्यातील काही लोकांचा भाजपासोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता. पण त्यांनी स्वीकारला नाही. त्यापुढची जी स्टेप होती ती आम्हाला कोणाला मान्य नव्हती. आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे शरद पवार म्हणाले.
अजित पवारांची घरवापसी शक्य आहे का? या प्रश्नावर शरद पवारांनी नाही असे म्हटले आहे. माझी आजही तीच भुमिका आहे. पंकजा मुंडे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला तर स्वागतच आहे. भाजपाचे सरकार नको अशी जनतेची भावना आहे, असे पवार म्हणाले.
५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकू असे बावनकुळे म्हणाले होते. यावर विचारले असता बावनकुळेंना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांना स्वत:ला पक्षाने संधीदेखील दिली नाही, त्या माणसाला काय महत्व द्यायचे, असा टोला पवारांनी हाणला. देशात कंत्राटी नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शाळाही दत्तक देऊ लागल्याने खाजगी लोक त्याचा गैरवापर करतील अशी भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.