अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 11:59 AM2024-06-06T11:59:31+5:302024-06-06T12:00:01+5:30
Maharashtra Politics: अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला असून ते स्वत:च्या मतदारसंघातून पत्नीलाही निवडून आणू शकलेले नाहीत. पुण्यात अजित पवारांचा चांगला प्रभाव आहे, तरीही आजुबाजुचे दोन मतदारसंघातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला तीन पक्षांमुळे घवघवीत यश मिळेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांचा पुतण्याच फोडला की विरोधकच राहणार नाही असा भाजपचा समज फोल ठरला आहे. यामुळे शिंदेंच्या पक्षात नाही परंतु अजित पवारांनी फोडलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांत कमालीची चलबिचल सुरु झाली आहे. अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला असून ते स्वत:च्या मतदारसंघातून पत्नीलाही निवडून आणू शकलेले नाहीत. पुण्यात अजित पवारांचा चांगला प्रभाव आहे, तरीही आजुबाजुचे दोन मतदारसंघातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे.
अशातच पवारांनी दिल्लीला जाणे टाळले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे धास्तावलेले आमदार जाणार की पाठ फिरविणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीच्या या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या गोटातील आमदारांत अस्वस्थता असून हे आमदार त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पुन्हा शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला केंद्रात एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी उद्या अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी सुप्रिया सुळेंशी संपर्क साधल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच आमदारांकडूनही सुळेंशी संपर्क केला जात असल्याचे सांगितले जात आहे. हे आमदार पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला जाऊन आमदारकी टिकविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. आता बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात, या बैठकीत काय सूर निघतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.