Sharad Pawar मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:34 PM2023-07-05T16:34:56+5:302023-07-05T16:44:29+5:30
Sharad Pawar Speech: भुजबळांवरही वार, शिवसेना-भाजपातील हिंदुत्वाचा फरक सांगितला, शिवसेनेसोबत जे झाले ते राष्ट्रवादीसोबत सुरु. आपले काही लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. ते पुन्हा येण्यासाठी अस्वस्थ आहेत. - शरद पवार
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. शरद पवारांचे वागणे कसे दुटप्पी असते हे त्यांनी सांगितले. यावर शरद पवारांनी देखील पलटवार केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर, पक्षावर आणि चिन्हावर दावा अजित पवार गटाने दावा केल्यावर मी वेगळा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसची प्रॉपर्टी सोडून दिली होती, असे सांगितले.
शिवसेनेसोबत जे झाले ते राष्ट्रवादीसोबत सुरु. आपले काही लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. ते पुन्हा येण्यासाठी अस्वस्थ आहेत. मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे. माझ्या नाव, फोटोशिवाय यांचे नाणे चालणार नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले.
23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी लागते, असे शरद पवार म्हणाले.
चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. ज्या लोकांनी आमदारांना निवडून दिले ते आमच्यासोबत आहेत असे सांगतानाच भुजबळांनी बघुन येतो म्हणून सांगून गेले आणि दुपारी मंत्रिपदाची शपथ घेतली, अशी टीका पवार यांनी केली. भाजपासोबत आम्ही गेलो त्यात काही चूक नाही, असे ते म्हणतात. जे जे लोक भाजपासोबत गेले त्यांचे सरकार चालले नाही. त्या पक्षांना संपविले. पंजाब, तेलंगाना, आंध्रप्रदेश, बिहारमध्ये झाले. भाजपासोबत सरकार काही महिने ठीक चालते, त्यानंतर जो सहकारी आहे त्याला उध्वस्त करणे, तोडफोड करणे हे होते. आज जो तुम्ही निर्णय घेतलात तो चर्चा करून घेतला असता तर अधिक चांगले झाले असते. एक लक्षात ठेवा या राज्यांत जे घडले तेच तुमच्यासोबत घडणार आहे, असा इशारा देखील पवार यांनी अजित पवारांना दिला.
शिवसेना आणि भाजपात फरक आहे. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण होते. बाळासाहेबांनी तेव्हा पत्रक काढले, इंदिरा गांधी संकटात आहेत. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. शिवसेनेने एकही उमेदवार दिला नाही. काँग्रेसने विधानपरिषदेत शिवसेनेच्या लोकांना जागा दिली. भाजपाचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विद्वेशवादी, मनुवादी आणि विघातक आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व आहे ते लपवून ठेवत नाहीत. ते हिंदुत्व अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे, असा दोन पक्षांतील हिंदुत्वाचा फरक पवारांनी सांगितला.