अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:10 PM2023-12-01T12:10:39+5:302023-12-01T12:12:12+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरू आहे.

Ajit Pawar came to power not for selfishness, but for development - Chhagan Bhujbal | अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ

अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ

कर्जत : राजकारणाच्या वेळी राजकारण करा. पण, शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण करू नका. प्रफुल्ल पटेल यांनी काल अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. एकदा नाही, अनेकदा युतीसोबत जाण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे सर्व खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा १९९९ चाच आहे. आम्ही भाजपसोबत गेलो असलो तरी विचारधारा सोडलेली नाही. तुम्ही चार-चार वेळा बोलणी केली. आघाडी करण्याचा शब्द दिला आणि ऐनवेळी माघारी फिरले. ते चालते आम्ही भाजपसोबत गेलो, ते का चालत नाही? आम्ही आमचा पक्ष सोडला नाही. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानेच जाणार आहोत. नितिश कुमार, जयललिता, मेहबूबा मुफ्तींनी पक्ष बदलला, पण विचार बदलला का? अडीच वर्ष शिवसेनेसोबत होतो, पण विचारधारा बदलली का? असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत क्रमांक दोनचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) राहिला आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत आहे. त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याच पक्षाचे नाव आहे. त्यामुळे गावपाळीवर मुळापर्यंत पक्ष रुजला पाहिजे. आपल्याला जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणावे लागतील. अडचणीत आलेल्या लोकांसाठी आपण मदत केली पाहिजे. अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले. अजित दादांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि आम्ही त्याच मार्गाने जाणार आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, कर्जतमध्ये छगन भुजबळांना मराठा आंदोलकांनी विरोध दर्शविला होता. यादरम्यान आंदोलकांकडून 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबतही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. नाशिकमध्ये गारांच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. त्यांचे अश्रू पुसायला जाणे माझे कर्तव्य होते. पण काहीजण चले जाओ चले जाओ करत होते. गावबंदी असल्याचे सांगून मला प्रवेश दिला जात नव्हता. पण काहींना प्रवेश दिला जातो. त्यामुळे राजकारण कोण करतंय हे आम्हाला माहीत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. दोन समाजात वाद निर्माण करण्याचे षड्यंत्र कोणाचे, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. मराठा समाजाने ५८ मूकमोर्चे काढले, त्यांचा आवाज त्या-त्या वेळेच्या सरकारांपर्यंत गेला. पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षणासाठी एक कायदा पास केला. तो फेल गेला. फडणवीस सरकारने एक कायदा पास केला, तोही फेल गेला. पण म्हणून सरकार थांबले नाही, त्यांनी काम सुरु ठेवले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

Web Title: Ajit Pawar came to power not for selfishness, but for development - Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.