अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळांची महत्वाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:09 PM2024-09-09T12:09:33+5:302024-09-09T12:09:58+5:30
Ajit pawar News: बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत.
बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर विरोधक, सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार लढणार की नाही यावर वक्तव्य केले आहे.
अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. अजित पवार निवडणूक लढविणार, मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत. लोकसभा निवडणुकीत जे झाले ती व्यथा त्यांनी मांडली आहे. मी 78 वर्षांचा आहे. मग मला ते लढायला का सांगतात, वय आहे ते तो काही मुद्दा नाही, असे भुजबळ म्हणाले.
अर्थखात्यावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार सर्वांचे पैसे देणार, जशी पुंजी जमा होते तसे देणार आहे. उशीर होणे हे काही नवीन आहे का? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळातही 3-३ वर्षे उशीर होत होता, प्राध्यान्य कशाला हे ठरवले जाते, असे भुजबळ म्हणाले.
तसेच महायुतीच्या तिन्ही घटकांना चांगले यश मिळवायचे असेल तर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करू नये. विरोधकांना खाद्य देऊ नये, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तशा सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.
लोकप्रतिनिधींनी नाशिकच्या खड्यांबाबत आवाज उठवला ते ठीक आहे. आयुक्त आणि अधिकारी लक्ष देतील. मी काल अडीच पावणेतीन तासात मुंबईहुन आलो, काम चांगल्या पद्धतीने होत आहे, असे ते म्हणाले. आचारसंहिता लागू होण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याची मला कल्पना नव्हती. त्यांच्याबाबत आदर असल्याचे भूजबळ यांनी स्पष्ट केले.